गल्लीतला दादा अन् दिल्लीतला दादा सारखाच : अॅड.बाळासाहेब आंबेडकर
देशाला दादागिरी करणारा नव्हे तर माणूसकी जपणारा पंतप्रधान हवा
चिखली : देशातील लोकसभा निवडणूक ही महत्वाच्या टप्प्यावर येवून ठेपली असून समान व्यवस्थेचे आवाहन देशापुढे उभे ठाकले आहे. या देशात पुढे काय काय घडणार आहे हे निश्चित सांगता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात अगदी बेंबीच्या देठापासून बाबासाहेब पुन्हा आले तरी या देशाचे संविधान बदलणार नाही असा प्रचार करताहेत. मोदी स्वत:सह आपल्याला फसवत असून मोदीने हा जुमला केला आहे. संविधान बदलण्याचा आरोप मोदी व आरएसएस वर केला जात असून बाबासाहेब येणारच नाही तर बदलणार कुठून? तर ते मोदी बदलणार असा प्रचार केला जात असून त्याला जनतेने बळी पडू नये, गल्लीतला दादा आणि दिल्लीतला दादा यात फरक काय? तर या देशाला माणूसकी जपणारा पंतप्रधान हवा असे आवाहन अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी आज ता. 19 रोजी वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार वसंतराव मगर यांच्या प्रचारसभेदरम्यान केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, राज्य अध्यक्षा सविताताई मुंढे, बुलढाणा महिला अध्यक्षा विशाखाताई सावंत, चिखली ता.अध्यक्ष संजय धुरंधर, शहराध्यक्ष बाळासाहेब भिसे, प्रदीप वाकोडे, अर्जुन बोर्डे, सुमेध जाधव उपस्थित होते.
आभार प्रदर्शन प्रदीप वाकोडे यांनी केले.
पुढे बोलतांना अॅड.बाळासाहेब म्हणाले, मोदीने पंतप्रधान झाल्यावर या देशाचे संविधान बदलणार की नाही बदलणार हे अगोदर स्पष्ट करावे, जोपर्यंत याबाबत मोदी ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत तो आपणा सर्वांना फसवतोय. मोदी असे का बोलतोय याचा विचार आपण सर्वांना केला पाहिजे. या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे यजमान प्रभाकरन यांनी दिलेली मुलाखत देशातील सर्वांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. त्यांनी सांगितले आहे की, मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास या देशाचे संविधान बदलण्यात येणार असून, गोध्रा व मणिपूर प्रकरणात जे काही घडले ते भविष्यात मोदी सत्तेवर आल्यास देशात ते जागोजागी घडू शकते तसेच पंतप्रधान मोदींची ही शेवटची निवडणुक असेल. एकाप्रकारे मंत्रीपद घालविणारी तसेच स्वत:च्या कुटूंबाचा जीव धोक्यात घालणारी ही मुलाखत ठरू शकते. नेमके जनतेला याबाबत आगाह करण्याचा प्रयत्न करीत आहे. मोदी सत्तेत आल्यास देशाचा नकाशा नक्कीच बदलणार आहे. शिवसेना व काँग्रेस कार्यकर्त्यांना या जुलमी सरकारला धडा शिकविण्याची संधी असून दुर्देवाने काँग्रेसने शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवला मात्र काँग्रेसचे किती उमेदवार निवडून येतील हा प्रश्नचिन्ह आहे. या देशातील 17 लाख हिंदु कुटुंब ज्यांची संपत्ती 50 कोटीच्या वर आहेत ते केवळ देशच नव्हे तर नागरिकता देखील सोडत आहेत. आणि दुसरीकडे याविरूद्ध जगातील सर्व हिंदू नागरिकांना प्रतिनिधीत्व देण्याच्या गप्पा मारल्या जात आहेत. असे सरकार आपल्याला पाहिजे का हा सारासार विचार आपण करून वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवार वसंतराव मगर यांना बहुसंख्येने निवडून द्यावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले.
इलेक्ट्रॉल बॉण्डसह भाजपाचे घोटाळे
भाजप सरकारने इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून मोठा घोटाळा केला असून त्याबाबतची माहिती जाहीर करावी. या माध्यमातून मोदी दादागिरी करून वसुली करणारा दादा म्हणजे गल्लीतला दादा व दिल्लीतला दादा सारखेच झाले आहे. ठिकठिकाणी ईडी व इतर वित्तीय संस्थांचा गैरवापर करीत तब्बल 13 हजार कोटी रूपये यांनी प्राप्त केले आहेत. सोबतच बोर्फार्स प्रकरणाची आठवण करून देत 135 राफेल विमान खरेदी करण्याचा करार रद्द करून केवळ 35 विमाने अंबानीकडून घेतले आहेत. उरलेली विमाने कुठे तयार करणार हे अंबानीने अद्यापपर्यंत सांगितलेले नाही. चायना हा आपल्या छाताडावर येवून बसलेला असून भाजपाने चायनाकडून पैसे घेतल्याचे उघड झाले आहे. एकेकाळी मोदींचे गुणगान करणारे रिटायर्ड फौजी अधिकारी मोदींना आज शिव्या घालत असून इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केल्याचे सांगत गेल्या 6 महिन्यात पाकिस्तानचा एकही सैनिक ठार मारल्याची बातमी आपण ऐकली काय? असा प्रतिप्रश्न केला. हे सरकार शेतकर्यांच्या मूळावर उठले असून सरकार कमकुवत झाले असून यांची सत्तेबाहेर जाण्याची वेळ आल्याचे शेवटी सांगितले.
या देशातील बळीराजाला भिकेला लावणार्या भाजपा सरकारला नेस्तानाबूत करण्याची वेळ आली असून गोरगरिब, कष्टकरी, शेतमजूर व तळागळातील सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याकरिता मला प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन लोकसभेचे उमेदवार वसंतराव मगर यांनी यावेळी केले.