विशेष बातमी

जिजाऊ जन्मस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कन्येच्या हस्ते जिजाऊंना मानवंदना

सिंदखेड राजा : राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिजाऊ जन्मस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरखेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कन्या प्रतिक्षा रामेश्वर जायभाये हिला जिजाऊंना अनोखी मानवंदना देण्याचा मान अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी दिला.स्वराज्याला दोन छत्रपती देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांची १२ जानेवारी रोजी जयंती आहे. दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव राज्यभर धुमधडाक्यात साजरा केला जातो. जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेड राजा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ राजवाडा उजळून निघतो. देशभरातून जिजाऊ भक्त अभिवादनासाठी मातृतीर्थावर येतात. अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके आणि जयश्रीताई शेळके यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलीला हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची संधी दिली. शेळके कुटुंबांचा या निर्णयाची काल दिवसभर चर्चा होती. नागरिकांनी हेलिकॉप्टरसोबत सेल्फी काढण्याचा आनंद घेतला.

गतवर्षी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांची कन्या अभिता हिच्या हस्ते जिजाऊ जन्मस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली होती. मात्र यावर्षी सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरखेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कन्या प्रतीक्षा रामेश्वर जायभाये हिच्या हस्ते जिजाऊ जन्मस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. या २० वर्षीय कन्येला हा मान सन्मान देण्यात आल्याच्या निर्णयामुळे अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके, दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई शेळके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. शेतकऱ्यांप्रती असलेली भावना त्यांनी निर्णयाद्वारे अधोरेखित केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *