जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी
दाताळा, मलकापूर शहरातील पूरस्थितीचा घेतला आढावा
बुलढाणा: मलकापूर तालुक्यातील दाताळा व मलकापूर शहरामध्ये पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी पाहणी करुन पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांसोबत संवादही साधला.दि. 12 ऑक्टोबर रोजी नळगंगा नदीला मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले. दाताळा येथील 476 घरांमध्ये पाणी शिरले तसेच शंभरहून अधिक गोठे वाहून गेले. तसेच मलकापूर नगरपालिका क्षेत्रात 855 घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. दिवसभर घरांमध्ये पाणी असल्यामुळे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी पाहणी दौरा करुन उपाययोजना केल्या.या दौऱ्यादरम्यान आमदार राजेश एकडे, माजी आमदार चैनसुख संचेती, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई तायडे, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.