नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत द्या- संदीप शेळके
जिल्हाधिऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
बुलढाणा : जिल्ह्यात २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत द्या, अशी मागणी वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी जिल्हाधिऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यात यापूर्वीच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानातून शेतकरी अजून सावरलेला नाही. तोच पुन्हा २६ फेब्रुवारी रोजी रात्री अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्याने जिल्ह्यात थैमान घातले. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मलकापूर, लोणार, संग्रामपूर, शेगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतीपिकांना मोठा फटका बसला. गहू, हरभरा, मका, ज्वारी, संत्रा, भाजीपाला पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू, बीबी,देवानगर, गोवर्धन नगर या भागात जोरदार पावसासह गारपीट झाली. किनगाव राजा परिसरातही शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, दुसरबिड भागातही गारपीट झाली. शेगाव तालुक्यातील भोनगावात जवळपास एका तासापेक्षा अधिक वेळेत गारपीट झाल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर अवकाळीमुळे संकटांचा डोंगर उभा ठाकला आहे. शेतकरी यामधून सावरला पाहिजे यासाठी शासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन मदत जाहीर करावी, अशी मागणी संदीप शेळके यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
जिल्ह्यातील शेतकरी आधीच मेटाकुटीस आलेला आहे. उत्पादनास भाव नसल्याने शेतकरी डबघााईस आलेला आहे. कोरोना काळापासून संकटात अडकलेला शेतकरी आता कुठे मोकळा श्वास घेऊ पाहत होता. मात्र पर्यावरणाने त्याच्या तोंडी आलेला हा घास सोमवारी रात्री हिरावून घेतला. सोमवारी सायंकाळपासूनच आकाशात ढग दाटून आले होते. सायंकाळी सात वाजेपासून अवकाळी पावसास सुरुवात झाली. जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी गारपीट झाली. अवकाळी पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याभरातील गहू, हरभरा, मका, ज्वारी, भाजीपाला, फळपिकांची प्रचंड हानी झालेली आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी संदीप शेळके यांनी केली.