बुलढाणेकरांच्या प्रेमाने भारावले सुनील शेळके एआरडी सिनेमातील ‘सत्यशोधक ‘चा शो हाऊसफुल्ल
बुलढाणा : क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाच्या ७ जानेवारी रोजी एआरडी सिनेमामधील शो ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. बुलढाणेकरांच्या प्रेमाने निर्माता सुनील शेळके भारावले.सत्यशोधक चित्रपट ५ जानेवारी रोजी राज्यभर प्रदर्शित झाला. चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निर्माता सुनील शेळके यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. राज्यभरात या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. महिलांचा प्रतिसाद सर्वात जास्त असल्याचे दिसून येत आहे. अनेक महिलांनी सावित्रीमाईंच्या वेशभूषेत चित्रपट बघितला.
शनिवारी ७ जानेवारी रोजी निर्माता सुनील शेळके यांनी सकाळी साडेअकरा वाजता बुलढाणा येथील एआरडी थिएटरमध्ये उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधला. महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरील भावस्पर्शी चित्रपट बघण्यासाठी बुलढाणेकरांनी गर्दी केली होती. प्रेक्षकांचे प्रेम पाहून भारावल्याची प्रतिक्रिया निर्माता सुनील शेळके यांनी व्यक्त केली.