महाराष्ट्रराजकीयविशेष बातमी

महायुती व महाविकास आघाडी अशी राहणार लढत.जयश्री शेळके यांना (उबाठा)ची उमेदवारी घोषित!

बुलढाण्यात तुल्यबळ उमेदवारीने होणार हाय व्होल्टेज ड्रामा

बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच पंचवार्षिक पासून या ठिकाणी मतदारांनी शिवसेनेला पसंती दिली. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार कोण ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आज सायंकाळी ‘मातोश्रीवरून’ जयश्रीताई शेळके यांच्या नावाची घोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. जयश्रीताई शेळके काँग्रेसमध्ये प्रदेश सरचिटणीस पदावर कार्यरत होत्या. त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा आज दुपारी मातोश्रीवर पार पडला. यानंतर त्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यांच्या रूपाने एक तगडा उमेदवार बुलढाणा विधानसभा मतदारसंघात उतरला असून या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा अर्थात रंगतदार लढत बघायला मिळणार आहे.

शिवसेनेच्या फुटी नंतर विद्यमान आमदार संजय गायकवाड हे
शिंदे गटात गेले. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत राहणार हे जवळपास निश्चित होते. महाविकास आघाडीत ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेगटाला सोडण्या आली आहे
कोण आहेत जयश्री शेळके

जयश्रीताई शेळके हे सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव मानले जाते. विविध सामाजिक चळवळीतून त्यांनी आपल्या करिअरला 1998-99 साली सुरुवात केली. जवळपास 20 वर्षापासून त्या सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. दिशा बचत गट फेडरेशन च्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी जिल्ह्यात मोठं संघटन उभं केलं आहे. महिला साठी आर्थिक चळवळ राबवण्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांचे पती सुनील शेळके हे निवृत्त उपजिल्हाधिकारी आहे.अनेक उद्योग व्यवसायांशी निगडित असल्याने जयश्रीताई शेळके यांचा असणारा मोठा जनसंपर्क, अनेक विषयांची खडान खडा माहिती आणि फरडे वकृत्व हे जयश्रीताई शेळके यांचे गुणवैशिष्ट्ये आहे. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. उमेदवारी घोषित होईपर्यंत त्या काँग्रेस पक्षात सक्रिय होत्या.

तिकिटाच्या घडामोडीत मारली बाजी

महाविकास आघाडीकडे मतदारांचा गेलेला कल पाहता बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक जण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लढण्यास इच्छुक होते. दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नावाची चर्चा ही झाली होती. तुपकर दोन वेळा मातोश्रीवर जाऊन आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचंही नाव चर्चेत होते. विधवा महिलांची चळवळ चालवणारे प्राध्यापक डी एस लहाने यांच्याही नावाची चर्चा मधल्या काळात झाली. याशिवाय दोन माजी आमदारांनी देखील आपली प्रतिष्ठा तिकिटासाठी पणाला लावली होती. मात्र तिकिटाच्या लढाईत जयश्रीताई शेळके यांनी बाजी मारली आहे. उमेदवारीचे मैदान त्यांनी मारले असून त्यांच्या उमेदवारीने अनेकांना धडकी भरली आहे.

शिवसेना विरुद्ध शिवसेना

शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याकडे महाविकास आघाडीचा कल होता. काँग्रेसने मधल्या काळात हा मतदारसंघ स्वतःकडे मागितला. यासाठी काँग्रेस नेत्यांनी प्रतिष्ठा पनाला लावली. दिल्ली पासून मुंबई पर्यंत खलबते झाली. मात्र जयश्री शेळके यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या उमेदवारीने जनाधार असणारा तुल्यबळ उमेदवार बुलढाणा विधानसभा मतदारसंघात उतरल्याने आमदार संजय गायकवाड यांना ही निवडणूक अर्थातच जड जावू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *