वाडीगोद्री येथील उपोषणाला ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची भेट
बुलढाणा : जालना जिल्ह्यातील वाडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावतर्फे सुरू असलेल्या उपोषणस्थळी १८ जून रोजी भेट देऊन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघातर्फे पाठिंबा दर्शविण्यात आला. ओबीसीसह भटक्या विमुक्त जमातीचे आरक्षण वाचावे यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. ओबीसीमधूनच मराठा आरक्षण घेणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं शासनाने लिखित स्वरूपात द्यावे, अशी मागणी ओबीसीचे लक्ष्मण हाके यांनी केली आहे. सदर आंदोलनातील मुद्दे महत्वपूर्ण असून ओबीसी हिताचे आहेत. याकरिता ओबीसी अधिकारी कर्मचारी संघातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला.यावेळी राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे, महासचिव राम वाडीभष्मे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष किशोर पवार, टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स येथील विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा देणारे पत्र दिले. सोबतच दोदडगाव या ठिकाणी असलेल्या मंडल स्तंभाला अभिवादन करून मंडल स्तंभाचे निर्माते व माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे यांच्याशी ओबीसीच्या प्रश्नाबाबत चर्चा केली.