विशेष बातमी

शेडनेट शेती शेतकऱ्यांच्या फायद्याची- सीताबाई मोहिते कृषी प्रदर्शनात प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान

सिंदखेड राजा : गावातील युवक कामासाठी शहरांकडे जात आहेत. तरुणाईला गावातच थांबवून त्यांच्या हाताला काम देण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात आभाळाखालची शेती केल्यापेक्षा शेतकऱ्यांनी ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, शेडनेट शेती केली पाहिजे, असे आवाहन जालना जिल्ह्यातील प्रगतीशील महिला शेतकरी सीताबाई मोहिते यांनी केले.अभिता ऍग्रो एक्स्पो राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात १३ जानेवारी रोजी अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके, दिशा बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सीताबाई मोहिते बोलत होत्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांनी शेती परवडत नाही असे म्हणू नये. पारंपरिक शेती करण्याऐवजी वेगळ्या पद्धतीने शेती करावी. शेतीत नवनवीन प्रयोग करावे. उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे. आपल्या मालाचे भाव आपण ठरवले पाहिजेत. आपल्याला मार्केटिंग यायला हवे. पुणे, मुंबईत भरलेल्या कृषी प्रदर्शनाला आपण जाऊ शकत नाही. अभिता कंपनी आणि राज्य शासनाचा कृषी विभाग यांनी सिंदखेड राजा येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रत्येक शेतकऱ्याने कुटुंबासह या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कृतिका गांगडे आणि प्रविण गीते यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी त्र्यंबक ठाकरे, उल्हास भुसारी, आकाश मेहेत्रे, शाहीर रामदास कुरंगळ, डॉ.दत्तात्रय बुरकुल, राजेश आढाव, सविता बुरकुल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन विनोद ठाकरे यांनी केले.

निरक्षर असूनही सिताबाईंची शेतीत भरारी

शेतकरी सीताबाई मोहिते यांचा आवळा प्रक्रिया उद्योग आहे. आवळा ज्युस, आवळा कँडी, आवळा गुलकंद असे आवळ्याचे त्यांचे १४ प्रकारचे उत्पादने आहेत. त्या निरक्षर आहेत. मात्र नवीन गोष्टी शिकण्याची त्यांना आवड आहे. कौशल्य शिकायला वयाची अट नसते असे त्या म्हणतात. निरक्षर असतांना सुद्धा त्यांनी विदेश दौरा केला आहे. त्यांना आतापर्यंत शासनाचे १३५ व इतर पुरस्कार मिळालेले आहेत. निरक्षर असूनही सिताबाईंनी शेतीत घेतलेली भरारी इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

या प्रगतीशील शेतकऱ्यांचा झाला सत्कार

कागदी लिंबू उत्पादक कैलास तायडे, सोयाबीन उत्पादक विठोबा उगलमुगले,
कपाशी उत्पादक सर्जेराव जायभाये, नर्सरी फळबाग शेतकरी अतिष ठाकरे,
मोसंबी उत्पादक शिवाजी बुधवत, आवळा उत्पादक पांडुरंग तांबेकर, शरद कायंदे, रावसाहेब कुळकुंबे, परमेश्वर आघाव, भरत नागरे, अरुण ताठे, संजय महेर, मधुकर मेहेत्रे, खंडू मेहेत्रे, अनिल बाहेकर, अरुण मेहेत्रे, प्रकाश चौधरी, विजय तायडे, त्र्यंबक मगर, राजेश ठाकरे, विशाल तांबेकर या शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *