महाराष्ट्ररोज़गार
सोनाळा संत्री हा जागतिक ब्रँड बनवणार सुनील शेळके अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या संत्रा प्रक्रिया उद्योगाचा शुभारंभ
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] संग्रामपूर सोनाळा परिसर संत्रा बेल्ट म्हणून ओळखला जातो. संत्र्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आली आहे. शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन येथे संत्रा प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे. भविष्यात सोनाळा संत्री हा जागतिक ब्रँड बनवू, असे प्रतिपादन अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक तथा सीईओ सुनील शेळके यांनी केले.
अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिल्या संत्रा प्रक्रिया उद्योगाचा शुभारंभ १० मार्च रोजी सकाळी त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके होते. मंचावर दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके, शिवसेना (उबाठा) गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर, जि. प. माजी अध्यक्ष प्रकाश पाटील
प्रदेशाध्यक्ष महिला ओबीसी आघाडी ज्योतीताई ढोकणे, माजी जि. प. उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ,माजी जि. प. सदस्य प्रमोद खोद्रे, शिवसेना (उबाठा) जळगाव जामोद तालुका अध्यक्ष गजानन वाघ, संग्रामपूर तालुकाप्रमुख (उबाठा ) रविंद्र झाडोकार, काँग्रेसचे संग्रामपूर तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर सरपंच हर्षल खंडेलवाल, प्रकाश देशमुख, जि. प.सदस्य गजानन काकड, शामशील भोपळे, डॉ.प्रमोद अरबट, अताउल्ला पठाण सर, नक्कलसिंग भाटीया, समाधान दामधर, जाहीर अली, एम. डी. साबीर, संतोष मेढे, भीमराव पाटील, सुनील सोळंकी, गणेशराव रिंढे, अर्चनाताई शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महानायिकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्र्याचा हार घालून सुनील शेळके यांचा सत्कार केला. इतर प्रमुख मान्यवरांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सोनाळा संत्री या ब्रँडचे लोकार्पण झाले. पुढे बोलतांना सुनील शेळके म्हणाले, पारंपरिक शेती आता परवडणारी नाही. काळानुरूप शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, फळशेती, फुलशेतीची कास धरावी. आपण जे पिकवतो त्याचे मार्केटिंग करता आले पाहिजे. सोनाळा, संग्रामपूर परिसर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. शेतकरी संत्र्याचे मुबलक उत्पादन घेतात. मात्र या भागात संत्रा प्रक्रिया उद्योग नव्हता. ही बाब लक्षात घेऊन अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजने संत्रा प्रक्रिया उद्योग सुरु केला आहे. भविष्यात याठिकाणी संत्रा प्रक्रियेचे आणखी इतर उद्योग सुरु करण्यात येणार आहेत.
यावेळी बोलतांना जयश्रीताई शेळके म्हणाल्या की, दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात आर्थिक चळवळ काम करीत आहे. स्वतःचा उद्योग सुरु करून अनेक महिलांनी उन्नती साधली आहे. सोनाळा, संग्रामपूर संत्रा उत्पादकांचा परिसर म्हणून परिचित आहे. अभिता कंपनीने सुरु केलेल्या संत्रा प्रक्रिया उद्योगामुळे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, ही बाब मनाला समाधान देणारी असल्याचे जयश्रीताई शेळके म्हणाल्या. सोनाळा परिसरात संत्रा प्रक्रिया उद्योग सुरु करुन अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजने शेतकऱ्यांच्या कल्याणाचे कार्य केल्याचे संगीतराव भोंगळ म्हणाले. दत्ता पाटील म्हणाले की, संत्रा प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून सोनाळ्याचे नाव देशभरात पोहचणार असून सुनील शेळके, जयश्रीताई शेळके यांच्या दूरदृष्टीचे त्यांनी कौतुक केले. सोनाळा येथे सुरु झालेला महत्वाकांक्षी संत्रा प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग दाखवेल, अशी आशा प्रकाश अवचार यांनी व्यक्त केली. संत्रा प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा येईल, असा विश्वास ज्योतीताई ढोकणे यांनी व्यक्त केला. स्वातीताई वाकेकर यांनी शेळके दाम्पत्याच्या विकासाच्या व्हीजनचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचलन स्वप्नील देशमुख यांनी केले तर आभार मनोज वाघ यांनी मानले.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकला आनंद
अभिता कंपनीने सोनाळा येथे संत्रा प्रक्रिया उद्योग सुरु करुन कौतुकास्पद कार्य केल्याच्या भावना अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्या. उद्योगाचा परिसर प्रशस्त व सुसज्ज आहे. तीन अत्याधुनिक मशीन्स बसवण्यात आल्या आहेत. दोन तासामध्ये १० टन संत्र्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता या मशिन्सची आहे. माफक दरात याठिकाणी संत्रा क्लीनिंग, वॅक्सिंग, ग्रेडिंग करुन मिळणार आहे. याच कामासाठी यापूर्वी आम्हाला अमरावती, मोर्शी, नागपूर जावे लागायचे. आता सोनाळ्यातच ही सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ आणि पैसा वाचणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
शेतकऱ्यांनी अनुभवले संत्रा प्रक्रियेचे प्रात्यक्षिक
जिल्ह्यात खामगाव, मलकापूर एमआयडीसी सोडली तर फार काही उद्योग नाहीत. तिथेही कुणाला जायला मिळत नाही. उद्योग कसा चालतो हे पाहण्याची संधी मिळत नाही. रविवारी सोनाळा व पंचक्रोशीतील नागरिकांना ही संधी मिळाली. संत्रा प्रक्रिया कशी केली जाते याचे प्रात्यक्षिक त्यांना दाखवण्यात आले. शेतकरी व नागरिकांना अत्याधुनिक मशिन्स जवळून बघता आल्या. त्यांचे काम कसे चालते या बाबींची माहिती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी जाणून घेतली.