महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षा हेल्पलाईनची गरज- संदीप शेळके

शेगावातील महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद शेगाव जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र महिला सुरक्षा हेल्पलाईन असली पाहिजे. टोलफ्री क्रमांकावर भगिनी आपल्या तक्रारी मांडतील. त्यावर धडक कारवाईसाठी सुसज्ज महिला कमांडचे पथक हवे. यामुळे महिलांवरील अत्याचार थांबतील, असे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केले.
येथील वर्धमान जैन भवनात ७ जानेवारी रोजी आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सविता झाडोकार होत्या. मंचावर प्रीती शेगोकार, माया दामोदर, अरुणा देशमुख, शीतल शेगोकर, शोभा जवंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, स्त्रिया आज कुठेच मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला कार्यरत आहेत. स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, आर्थिक साक्षर व्हावे याकरिता राजर्षी शाहू परिवाराने नेहमीच पुढाकार घेतला आहे. बचतगटांच्या ३५ हजार महिलांना १५० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. या माध्यमातून अनेक महिला उद्योजक समोर आल्या याचे समाधान आहे. यावेळी संदीप शेळके यांनी माता- भगिनींशी संवाद साधला. वन बुलढाणा मिशनची भूमिका त्यांच्यासमोर मांडली. मेळाव्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल असल्याचे दिसून आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद येवले यांनी केले. संचलन व आभार प्रीती सावळे यांनी मानले.
सिंदखेडराजात जिजाऊ स्त्री शक्ती केंद्र उभारणार
जिजाऊंच्या नावाने बचतगटांच्या महिलांच्या उत्पादनासाठी एक ब्रँड असावा. जिल्ह्यातील विधवा, निराधार, दिव्यांग, शेतमजूर महिलांची शासकीय नोंदणी अभियान राबविण्यात आले पाहिजे. महिला आरोग्य अभियान, युवती आवास योजना, बुलढाणा युवती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्पोर्ट्स फेस्टिवल, वार्षिक महिला भजनी मंडळ महोत्सव, बुलढाणा वुमेन सिंगिंग व डान्सिंग आयडॉलचे अशी स्पर्धा वर्षातून एकदा आयोजित केली पाहिजे. यामधून महिलांच्या कलागुणांचा विकास होईल आणि स्पर्धा जिंकण्याची उर्मी वाढेल. वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ स्त्री शक्ती केंद्र उभारण्यात येणार आहे. याद्वारे महिलांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करता येईल, असा विश्वास संदीप शेळके यांनी व्यक्त केला.
महिलांनी अंगभूत गुणांद्वारे प्रगती साधावी
महिलांमध्ये बचत, काटकसर, चिकाटी हे नैसगिक गुण आहेत. घेतलेल्या कर्जाची महिला नियमित परतफेड करतात. त्यांचा व्यवहार चोख असतो. महिलांचे एकही कर्जप्रकरण थकीत नाही. त्यामुळे कोणतीही बँक त्यांना कर्ज देण्यास तयार होते. महिलांनी आपल्यातील गुण ओळखावे. त्याचा योग्य वापर करुन प्रगती साधावी. राजर्षी शाहू परिवार कायम आपल्या पाठीशी आहे.