जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणांना जयश्रीताई शेळके यांचा पाठिंबा

बुलढाणा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांनी २ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या उपोषण मंडपांना भेट देऊन पाठिंबा दिला. तसेच मागण्यांबाबत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सपकाळ यांची उपस्थिती होती.धनगर समाज अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते नंदू लवंगे यांनी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. राज्यात धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणी बाबतीत दिवसेंदिवस भावना तीव्र होत आहेत. धनगर समाजबांधव मोठ्या प्रमाणात मेंढपाळ, अल्पभूधारक व भूमिहीन आहेत. समाजाची आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती बिकट असल्याने या समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण अंमलबजावणी तत्काळ करावी, अशी मागणी उपोषणकर्ते नंदू लवंगे यांनी केली आहे. जयश्रीताई शेळके यांनी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. मागणी रास्त असून हा विषय विधानसभेचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्याकडे लावून धरु, अशी ग्वाही दिली.
बुलढाणा, चिखली, रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेले अवैध धंदे बंद करुन पाठबळ देणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे, इसरार देशमुख यांनी २६ जानेवारीपासून उपोषण सुरू केले आहे. जयश्रीताई शेळके यांनी उपोषकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. समाजात शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याचे काम पोलिसांचे आहे. जिल्ह्यात कुठल्याही पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे सुरु असतील तर पोलीस प्रशासनाने याबाबत कारवाई केली पाहिजे. याविषयी आपण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा करु, असे आश्वासन जयश्रीताई शेळके यांनी उपोषणकर्त्याना दिले.