नागपूरचे अनिकेत उमरेडकर यांना मानाचा ‘शिव सन्मान गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान

नागपूर : विदर्भातील वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेत, अनिकेत अशोक उमरेडकर यांना ‘आपले रुग्ण हक्क परिषद’ तर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘शिव सन्मान गौरव पुरस्कार २०२६’ देऊन गौरवण्यात आले. ५ मार्च २०२६ रोजी पुण्याच्या ऐतिहासिक लाल महाल येथे एका दिमाखदार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
विशेष म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या केवळ १११ व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी येथील अनिकेत उमरेडकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर मानाचे स्थान मिळवले आहे. संस्थेचे संचालक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
अनिकेत उमरेडकर यांनी ‘वैद्यकीय मदत कक्षा’च्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. गोरगरीब जनता आणि महिलांसाठी त्यांनी दिलेली निःशुल्क सेवा समाजासाठी दिशादर्शक ठरली आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवेची दखल घेऊनच ‘आपले रुग्ण हक्क परिषद’ या संस्थेने त्यांना या पुरस्कारासाठी पात्र ठरवले.
केवळ वैद्यकीयच नव्हे, तर शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतही अनिकेत उमरेडकर यांचा सक्रिय सहभाग असतो. “तुमचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे आणि आदर्शवत आहे,” अशा शब्दांत सन्मानपत्राद्वारे त्यांच्या कार्याचा ‘मनाचा मुजरा’ देऊन गौरव करण्यात आला आहे.
”भविष्यातही समाजहिताचे हे कार्य असेच अखंड सुरू राहो,” अशा शुभेच्छा यावेळी मान्यवरांनी दिल्या.
या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल अनिकेत उमरेडकर यांच्यावर नागपूरसह संपूर्ण विदर्भातून, मित्रपरिवारातून आणि मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



