शिक्षण

मुख्याध्यापक तेजराव काळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित..!

विद्यार्थी संख्या ३ वरून ५० पर्यंत; लोकसहभागातून शाळेचा कायापालट, काळे सरांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक..!

चिखली :- शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ३ चिखलीचा कायापालट घडवून आणणारे मुख्याध्यापक मा. तेजराव रंगनाथ काळे सर यांना न.प. व मनपा शिक्षक संघ, शाखा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
काळे सरांनी आपल्या मेहनतीने आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून शाळेला नवी ओळख मिळवून दिली. विशेष म्हणजे, शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या अवघ्या ३ वरून ५० पर्यंत पोहोचविण्यात त्यांना यश आले. तसेच लोकसहभाग आणि विविध मान्यवरांच्या सहकार्याने शाळेची नवीन इमारत उभारण्यात आली.
शाळेत वर्षभर विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. ‘३६५ दिवस शाळा’ हा विशेष उपक्रम, माजी विद्यार्थी संघाची स्थापना, माजी विद्यार्थी व परिसरातील मान्यवरांचे वाढदिवस शाळेत साजरे करणे तसेच वृक्षारोपण अशा उपक्रमांमुळे शाळेविषयी नागरिकांमध्ये आपुलकी निर्माण झाली. लोकसहभागातून शाळेला आर्थिक मदतही मिळत गेली.
या कार्यासाठी नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर, शिक्षण सभापती रफिक शेठ, न.प. शिक्षक संघाचे अध्यक्ष रामदासभाऊ देव्हडे आणि सामाजिक कार्यकर्ते गोकुळ शिंगणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शिवम गाढवे सर, विद्या लोखंडे मॅडम, स्नेहा कापसे मॅडम आणि वैशाली खलसे मॅडम यांचेही शाळेच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर काळे सरांनी हा सन्मान केवळ आपला नसून शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि दानशूर व्यक्तींचा असल्याचे गौरवोद्गार काढले. त्यांच्या या कार्याचे चिखली शहरात कौतुक होत असून, राज्यस्तरीय पुरस्कारामुळे शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला नवी प्रेरणा मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!