जिल्हा वार्ता

लक्ष्मी रमण गोविंदा च्या जयघोषात लाटामंडप उत्सव संपन्न भाविकांच्या साक्षीने रंगला डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा

लक्ष्मी रमण गोविंदा च्या जयघोषात लाटामंडप उत्सव संपन्न भाविकांच्या साक्षीने रंगला डोळ्यांचे पारणे फेडणारा सोअठरा पगड जाती धर्मांच्या भाविक भक्तांकडून घडली विशेष सेवा

दे.राजा (प्रतिनिधी) प्रतितिरुपती म्हणून ओळख असलेल्या श्री बालाजी महाराजांचा आगळा वेगळा व अवघ्या महाराष्ट्रात देऊळगाव राजा शहरातच पार पडणारा लाटा मंडपोत्सव बोल बालासाहेब की जय, लक्ष्मी रमण गोविंदा च्या जयघोषात, उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मंदिरातील घंटानाद, प्रवेशद्वारावरील नगारे आणि गोविंदा गोविंदा च्या गजराने श्री बालाजी मंदिर परिसर गजबजला.

आश्विन शु. ८ सह ९ सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सुरू झालेला मंडपोत्सव सोहळा भाविक भक्तांच्या साक्षीने रंगला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या उत्सवात मानकरी, भाविक भक्तांनी ४२ मंडपाला दोर बांधून दिड फुट व्यास व बत्तीस फुट उंचीच्या २१ महाकाय सागवानी लाटांची उभारणी केली. महाद्वाराशेजारील हनुमानाची प्राचीन दगडी मूर्ती व संस्थानसमोरील गरुडाची दगडी मूर्ती या दोन्ही मुर्त्यांना हा अखंड दोर बांधून महाकाय लाटामंडप उभारण्यात आला. या कार्यासाठी मानकरी व सर्व समाजबांधवांचे सहकार्य लाभले. लाटामंडप उभारणीनंतर सर्व मानकऱ्यांना श्री बालाजी संस्थानच्या वतीने प्रसाद वितरित करण्यात आला.

श्री बालाजी संस्थानच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या नियोजनानुसार आश्विन शु. ९ सह १० मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मध्यरात्री १२ वाजता पालखी मिरवणूक निघणार असून श्रींची पालखी आश्विन शु. १०, बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण शहराला प्रदक्षिणा घालून मंदिरात विराजमान होईल. आश्विन कृ. ४ गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सूर्योदयी ५ वाजून ४५ मिनिटांनी लळित उत्सव संपन्न होणार आहे,

भाविक भक्तांना सहजतेने कानगी तसेच शाश्वत अन्नदान देणगी देता यावी, यासाठी श्री बालाजी संस्थानच्या वतीने स्वतंत्र क्युआर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भाविकांना त्या क्यूआर कोडचा वापर करून देणगी जमा करता येईल, अशी माहिती श्री बालाजी संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

सर्व भाविकांनी श्रींच्या उत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा, प्रसादाचा व यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव व व्यवस्थापक किशोर बीडकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!