पिंपळगाव राजामध्ये सर्वधर्मीय संमेलन कार्यक्रमातुन ऐतिहासिक एकात्मतेचा संदेश

बुलडाणा [ प्रतिनिधी ] जिल्हा खामगाव तालुका अंतर्गत पिंपळगाव राजा येथील भारत लॉन सभागृहात दि ११ जानेवारी रोजी सर्व धर्मिय भव्य सद्भावना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांचे गुलाबाच्या फुलांनी स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. सैयद रफीक पारनेरकर विराजमान होते.कार्यक्रमात सर्वप्रथम पिंपळगाव राजाचे सद्भावना मंच अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी आपले विचार मांडताना सांगितले की,“आमचे गाव हिंदू-मुस्लिम एकतेचे जिवंत प्रतीक आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे.”त्यांच्या या विधानाला उपस्थित नागरिकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यानंतर आदिवासी समाजाचे प्रतिनिधी प्रशांत सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, इस्लाम हा समानतेचा धर्म असून आदिवासी संस्कृतीतही सर्व मानव समान मानले जातात. कोणताही भेदभाव आमच्या संस्कृतीत नाही. दोनही संस्कृतींची मूल्ये मानवतेवर आधारित असल्याने समानतेचा संदेश देणारी आहेत.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोवर्धनसिंग जळगांव खां यांनी देशातील सद्यस्थितीवर प्रकाश टाकताना सांगितले की,“देशात अनेक भावना आहेत; त्यात नफरत पसरवणाऱ्या भावनाही आहेत. परंतु हा देश स्वातंत्र्य संग्रामातील वीरांच्या प्रेम, ऐक्य व बंधुभावावर उभा आहे. आजही देशाच्या सीमेवर सर्व धर्मांचे सैनिक एकत्र येऊन राष्ट्रसेवा करीत आहेत. त्यामुळे नफरत ही कधीच या देशाची ओळख होऊ शकत नाही.”यानंतर वेरुळकर गुरुजी यांनी संत-परंपरेचा उल्लेख करत सांगितले की सर्व संतांनी मानवता आणि एकात्मतेचा संदेश दिला.“देव एकच आहे; भेद, भाषा, वेशभूषा आणि जात-पात ही माणसांनी निर्माण केलेली भिंत आहे. तापासाठी औषध एकच असते, तसेच मानवतेसाठी सत्य एकच असते,” असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी सद्भावनेचे कार्यक्रम समाजाला जोडणारे असल्याचे सांगून अशा कार्यक्रमांची गरज आज अधिक असल्याचे नमूद केले.
पिंपळगाव राजा ठाणेदार भागवत मुळीक यांनी आपल्या भाषणात समाजएकतेचा संदेश देताना सांगितले की, एका घराची प्रगती म्हणजे गावाची, गावाची प्रगती म्हणजे राज्याची आणि अखेरीस देशाची प्रगती. त्यामुळे धर्माच्या आधारावर भेदभाव न करता सर्वांनी राष्ट्रहितासाठी एकत्र यावे. जो देशाची सेवा करतो तोच खऱ्या अर्थाने सन्मानास पात्र आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.परभणी येथील ह.भ.प. धर्मकीती महाराज सावंत यांनी या कार्यक्रमाला दिशा देणारा ऐतिहासिक उपक्रम असे संबोधले. जात-पात या स्वार्थी व्यवस्थांची देणगी असल्याचे सांगून सूफी संत व महान संतांनी लोकांना जोडण्याचे, बंधुभाव वाढवण्याचे कार्य केले आहे. “जो माणुसकीचा संदेश देतो तो माझा बांधव आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.सत्यपाल महाराज शिरसोलीकर यांनी सद्भावनेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. त्यांनी एका मुस्लिम महिला व एका हिंदू महिलेला स्टेजवर बोलावून परस्पर स्वागत करून दाखवले आणि सांगितले “हीच खरी सद्भावना आहे. ज्याच्याकडे जास्त आहे त्याने कमी असणाऱ्याला द्यावे—हेच धर्म, हीच माणुसकी.”अध्यक्षीय भाषणात डॉ. रफीक पारनेरकर म्हणाले की,“नमाज, रोजा, जकात यापेक्षा मोठी काम महत्त्वाची असली तरी लोकांना जोडणे हे त्याहूनही मोठे कार्य आहे. जो माणूस समाजाला जोडत नाही तो अपूर्ण आहे. द्वेष पसरवणारे हजारोंमध्ये असतात; परंतु प्रेम पसरवणारे लाखों-करोडोंमध्ये असतात. संतांची शिकवण हीच होती—माणुसकी सर्वांत मोठी.”कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शांततेत यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमाते इस्लामी हिंद बुलढाणा जिल्हाध्यक्ष सोहेल फुर्कान यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी जमाते इस्लामी हिंद, पिंपळगाव राजा चे शहराध्यक्ष मोहम्मद जियाउल्ला यांनी आभार मानले कार्यक्रमाला जमाते इस्लामी हिंद जिल्ह्यातील पदाधिकारी व पिंपळगाव राजा परिसरातील बहुजन सर्व धर्मिय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते



