हातेडी येथील बाधित शेतकऱ्याला समाजमित्र शिवाजीराव तायडे यांच्याकडून ५१ हजारांची तातडीची मदत
सोयाबीनची सुडी जाळल्याने संकटात सापडलेल्या जाधव कुटुंबाला दिलासा

बुलढाणा (प्रतिनिधी) : तालुक्यातील हातेडी येथील शेतकरी राजेंद्र आनंद जाधव यांच्या चार एकरातील सोयाबीनची सुडी अज्ञात समाजकंटकांनी जाळून खाक केल्याची घटना घडली. या आगीत सुमारे तीस क्विंटल सोयाबीन जळून खाक झाल्याने जाधव कुटुंबाचे दोन लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने हवालदिल झालेल्या या शेतकरी कुटुंबाच्या मदतीला अंभोडा येथील समाजमित्र शिवाजीराव तायडे धावून आले असून, त्यांनी पीडित शेतकऱ्याला ५१ हजार रुपयांची रोख मदत देऊन आधार दिला.हातेडी येथील राजेंद्र जाधव यांनी चार एकरातील सोयाबीन काढून शेतात सुडी लावली होती. मात्र समाजकंटकांनी ती पेटवून दिल्याने काही तासांतच संपूर्ण पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीराव तायडे यांनी थेट घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पीडित शेतकरी राजेंद्र आनंद जाधव आणि विमल राजेंद्र जाधव यांच्याकडे ५१ हजार रुपयांची रोख आर्थिक मदत सुपूर्द केली.याप्रसंगी सरपंच श्रीकांत जाधव, शिवसेना शाखाप्रमुख संदीप जाधव, शंकरराव तायडे, ज्ञानेश्वर पवार, माधवराव भुसारी, भागवतराव तायडे, विनोद तायडे, अनंता थोरात, कार्तिक जाधव, पंजाबराव जाधव, शिवाजी जाधव, अरविंद तारगे, सिद्धेश्वर दळवी, गजानन जाधव, निंबाजी जाधव, सुनील फौजी, राहुल कुलकर्णी, शुभम जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ऐन संकटाच्या वेळी शिवाजीराव तायडे यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे व मदतीचे परिसरातून कौतुक होत आहे.



