शेळगाव बॅरेजमध्ये जळगावच्या राजू नेरकर यांची उडी; पुलावर स्कूटर, चप्पल अन् आधारकार्ड आढळल्याने खळबळ!
नातेवाईकांना आत्महत्येचा संदेश पाठविल्याची माहिती; यावल पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

यावल ( प्रतिनिधी ): तालुक्यातील शेळगाव बॅरेजच्या पुलावरून जळगाव येथील एका व्यक्तीने पाण्यात उडी घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) सकाळी उघडकीस आली. राजू नेरकर असे या व्यक्तीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी त्यांची नवीन जुपिटर स्कूटर, चप्पल आणि आधारकार्ड आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास जळगावच्या दिशेने आलेली एक व्यक्ती एमएच-१९-ईआर-९४८४ क्रमांकाच्या नवीन जुपिटर स्कूटरवरून शेळगाव बॅरेज परिसरात पोहोचली. नागरिकांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून खुल्या करण्यात आलेल्या बॅरेजच्या पुलावर संबंधित व्यक्तीने स्कूटर उभी केली होती. काही वेळानंतर पुलावर स्कूटरजवळ चप्पल आणि आधारकार्ड आढळून आले. संबंधित व्यक्तीने बॅरेजच्या पाण्यात उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली. घटनेची वार्ता पसरताच पुलावर नागरिकांची गर्दी जमली. दरम्यान, यावल पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून घटनास्थळी आढळलेली स्कूटर व इतर वस्तू ताब्यात घेतल्या. आधारकार्डाच्या आधारे संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या घटनेला अधिक गंभीर वळण देणारी माहिती समोर आली असून, राजू नेरकर यांनी घटनेपूर्वी नातेवाईकांना संदेश पाठविल्याचे समजते. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बॅरेजमधील पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत. शोधमोहीम आणि तपासातून घटनेबाबत अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.



