जिल्हा वार्ता

अनाथ मुलांसह वृद्धांच्या सहवासात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचा वाढदिवस साजरा

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपली; अनाथ मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात

यावल : यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही औपचारिक कार्यक्रम किंवा हार-तुरे स्वीकारण्याऐवजी अनाथ मुलांसह वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या सहवासात वेळ घालवत वाढदिवस साजरा केला. मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी गुरुनानक जयंतीच्या सुट्टीचे औचित्य साधून त्यांनी चोपडा तालुक्यातील वेले येथील अमर संस्था संचलित अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आणि प्रभू आश्रमाला भेट देत गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. या भेटीदरम्यान वृद्धाश्रमातील १३ आजी-आजोबांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी स्वेटर आणि कानटोप्यांचे वाटप करण्यात आले. तसेच आश्रमातील अनाथ मुलांसह वृद्धांना फळे वाटण्यात आली. हार-तुरे आणि सत्कार समारंभ टाळून वाढदिवसाच्या खर्चातील काही रक्कम सामाजिक कार्यासाठी देण्याचा निर्णय घेत त्यांनी अनाथ मुलांसोबत केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा केला. दिवसभर आश्रमात थांबून त्यांनी संस्थेची पाहणी केली तसेच गरजू घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी शेषराव पाटील यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेवाकार्यांची माहिती तहसीलदारांना दिली. विशेष म्हणजे, संस्थेचे हे सर्व सेवाकार्य विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. संस्थेचे कामकाज आणि सेवाभावी उपक्रम पाहून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी अमर संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब चंद्रकांत गुलाबराव पाटील (कोसगावकर) आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. अनाथ मुलांचे व वृद्धांचे संगोपन करण्यासोबतच मानसिकदृष्ट्या दुर्बल किंवा निराधार नागरिकांसाठी स्वतंत्र आश्रम उभारून त्यांच्यावर उपचार करणे आणि पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे परत पाठविण्याचा संस्थेचा उपक्रम अत्यंत माणुसकीचा आणि कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी यावल तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या अव्वल कारकून वैशाली पाटील याही उपस्थित होत्या. संस्थेच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आणि वैशाली पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!