राजकीय

विरोधकांना उत्तर देण्यासाठी घेतली पत्रकार परिषद; पत्रकारांच्या प्रश्नांपुढे सत्ताधारी निरुत्तर..!

२१ ठरावांसह शहरातील विकासकामांवर प्रश्नांची सरबत्ती; समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पत्रकारांचा बहिष्कार

चिखली | प्रतिनिधी : नगरपालिकेतील विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजप-शिवसेना सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेली पत्रकार परिषद अखेर वादाच्या भोवऱ्यात सापडली. १८ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील गोंधळ, अवघ्या पाच ते दहा मिनिटांत २१ ठराव मंजूर केल्याचा मुद्दा आणि सभेच्या कामकाजातील कथित अनियमिततेबाबत पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने पत्रकारांमध्ये नाराजी व्यक्त झाली.

भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देवडे, शिवसेना नेते कपिल खेडेकर, विष्णू जोगदंडे, दत्ता सुसर यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकारांनी सर्वसाधारण सभेतील २१ ठरावांची प्रक्रिया, गैरहजर नगरसेवक असताना ठराव मंजूर कसे झाले, बॉम्बे मार्केटचे बीएटी तत्त्वावरील बांधकाम, रोहिदास नगर व भीम नगरमधील नागरिकांना घरकुलांसाठी भूखंडांचे पट्टे, तसेच श्रीराम पतसंस्थेपासून बैलजोडीपर्यंतच्या सिमेंट रस्त्याबाबत प्रश्न उपस्थित केले. नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नियमितपणे का होत नाही, असाही सवाल करण्यात आला. मात्र, या प्रश्नांवर ठोस स्पष्टीकरण मिळू शकले नाही. विशेष म्हणजे, पत्रकार परिषदेसाठी प्रेस नोटचेही वितरण करण्यात आले नाही.

दरम्यान, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या अनुपस्थितीमुळेही चर्चा रंगली. शहराच्या कारभाराशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर नगराध्यक्षांकडून थेट उत्तरे मिळाली असती, अशी अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली.

प्रश्नोत्तरांचा सिलसिला सुरू असतानाच भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी पत्रकार परिषद संपल्याचे जाहीर केले. यावर पत्रकारांनी आक्षेप घेत, प्रश्नांची उत्तरे पूर्ण झालेली नसताना परिषद संपविण्याची घाई का, असा सवाल केला. त्यानंतर नाराज पत्रकारांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकत सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आयोजित केलेली पत्रकार परिषद अखेर सत्ताधाऱ्यांसाठीच अडचणीची ठरली. पत्रकार परिषद संपली; मात्र चिखलीकरांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही प्रतीक्षेतच राहिली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!