सिंदखेड राजा तालुक्यात घरपोच आहार योजना ठप्प — लाभार्थ्यांना आहार न मिळाल्याने नाराजी

सिंदखेड राजा : महिला व बाल विकास मंत्रालय (MWCD) यांच्या वतीने ऑक्टोबर 2025 महिन्यासाठी २५ दिवसांचा घरपोच आहार देण्यात येणार असल्याचे अधिकृत संदेशाद्वारे अनेक लाभार्थ्यांना कळविण्यात आले आहे. मात्र, सिंदखेड राजा तालुक्यातील लाभार्थ्यांना आजतापर्यंत कोणताही आहार प्राप्त झालेला नाही, असा प्रकार समोर आला आहे.
लाभार्थ्यांना आलेल्या या संदेशांनंतर नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी संबंधित अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही, अशी माहिती स्थानिक पातळीवरून मिळाली आहे. त्यामुळे शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत का, असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे.
MWCD च्या 14408 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न अनेक लाभार्थ्यांनी केला, परंतु त्या क्रमांकावर प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आणि संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
शासन दरवर्षी या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करते, तरीदेखील लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याने घरपोच आहार योजनेची कार्यक्षमता आणि देखरेख याबाबत गंभीर शंका व्यक्त केली जात आहे.
संबंधित विभागाकडून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून, योजना प्रत्यक्षात राबवली जाते का याची खात्री करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाबाबत सविस्तर चौकशी अहवाल मा. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, तसेच मा. प्रकल्प अधिकारी (ICDS), बुलढाणा यांच्याकडे सादर करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.



