चिखलीत संविधान दिन साजरा – चिखली मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारणार… आ. श्वेता महाले

चिखली प्रतिनिधी :- केंद्र सरकारने बाबासाहेबांच्या स्मृती जपण्याकरिता केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनमधील निवासस्थान विकत घेऊन ते ‘आंबेडकर मेमोरियल’ म्हणून विकसित करणे,पंचतीर्थाची निर्मिती,संविधानाशी संबंधित शैक्षणिक व संशोधन प्रकल्पांना प्रोत्साहन यांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर काल चिखली मध्ये झालेल्या प्रचार सभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासारखाच महामानव वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा उभारण्याचे वचन दिले आहे… आणि या वचना प्रति आम्ही बांधील आहोत असे आमदार सौ श्वेता महाले पाटील म्हणाल्या.
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने झाली…
या प्रसंगी आमदार महाले पाटील यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीतील बाबासाहेबांच्या योगदानाची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, “संविधान हा भारताच्या एकात्मतेचा आणि सामाजिक न्यायाचा मूलाधार आहे; पुढील पिढ्यांपर्यंत त्याची मूल्ये पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.या कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात आमदार श्वेता महाले पाटील यांनी असे मत व्यक्त केले की
“संविधानाचा सन्मान राखणे आणि सामाजिक समानता अबाधित ठेवणे, ही भाजपची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट आहे”
“काँग्रेसने संविधान व बाबासाहेबांचा वारंवार अनादर केला”…संविधान दिनानिमित्त आ. सौ. महाले यांनी काँग्रेसवर टीका केली.
“डॉ. आंबेडकरांना योग्य राजकीय मान्यता त्यांच्या आयुष्यात काँग्रेसने दिली नाही; उलट त्यांना पराभवाच्या दारात उभे केले.संविधान लागू झाल्यानंतरही अनेक दशके सामाजिक न्यायाशी संबंधित कायदे काँग्रेस सरकारांनी रखडवून ठेवले.”
आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करताना काँग्रेस त्यांचे विचार आणि कामांचा प्रत्यक्ष सन्मान करण्यात अपयशी ठरली.”स्थानिक राजकीय वातावरणात काँग्रेसने संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तत्वे स्वीकारली नाहीत तर त्यांच्या नावाचा फक्त राजकीय फायद्यासाठी वापर केला, त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या अमूल्य ठेवा जपणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला व नगरसेवकांनाच विजय करा असे आवाहनही त्यांनी केले…



