जिल्हा वार्ता
आलेवाडी तलावासाठी मच्छिमार संस्थांची नोंदणी सुरू १५ दिवसांत हरकती नोंदवण्याचे आवाहन
आलेवाडी तलावासाठी मच्छिमार संस्थांची नोंदणी सुरू १५ दिवसांत हरकती नोंदवण्याचे आवाहन
संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील नव्याने विकसित झालेला आलेवाडी बु.ल.पा. तलाव आता मत्स्यव्यवसायासाठी उपलब्ध झाला आहे. या तलावाच्याव्यवस्थापनासाठी संस्था नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यासंदर्भात इच्छुक मच्छिमार व संबंधितांकडून पुढील १५ दिवसांत आक्षेप व हरकती मागवण्यात आल्या आहेत. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच अवर सचिव व आयुक्त, मत्स्यव्यवसाय (महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांच्या पत्रान्वये सुधारित तलाव/जलाशय धोरण जाहीर करण्यात आले आहे. या धोरणानुसार बुलढाणा जिल्ह्यातील आलेवाडी बु.ल.पा. योजना (१११.९५ हेक्टर) हा तलाव लघुपाटबंधारे विभाग, बुलढाणा यांच्याकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), बुलढाणा यांच्या सूचनेनुसार स्थानिक व सक्रिय मच्छीमारांना समान संधी मिळावी आणि नैसर्गिक न्याय तत्त्वाचे पालन व्हावे, या उद्देशाने संस्था नोंदणीचे प्रस्ताव सार्वजनिक करण्यात आले आहेत. सध्या कार्यालयाकडे संस्था नोंदणी, नाव राखून ठेवणे आणि बँकेत खाते उघडण्यासाठी खालील तीन संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यामध्ये नियोजित बिरसामुंडा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या., आलेवाडी (ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा), नियोजित वीर टंट्या भिल आदिवासी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या., आलेवाडी (पो. टुनकी, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा), नियोजित आलेवाडी भुजलाशयीन मच्छिमार सहकारी संस्था (प्राथमिक) मर्या., आलेवाडी (ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा).ज्या कोणाला या प्रस्तावांवर काही हरकत किंवा आक्षेप घ्यायचा असल्यास, त्यांनी १५ दिवसांच्या आत आपले म्हणणे सादर करणे बंधनकारक आहे. प्राप्त हरकतींवर सर्व संबंधित घटकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच पुढील कायदेशीर निर्णय घेतला जाईल. १५ दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर आलेल्या कोणत्याही आक्षेपाची दखल घेतली जाणार नाही, असे सहकारी संस्था दुग्ध, बुलढाणा सहायक निबंधक सुभाष मो राठोड यांनी स्पष्ट केले आहे.



