चिखली शहराचा विकासासाठी व इतर अल्पसंख्याक समाजासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही –
पालकमंत्री मकरंद आबा पाटील व अल्पसंख्यांक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांना ग्वाही

- चिखली शहराचा विकासासाठी व इतर अल्पसंख्याक समाजासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – पालकमंत्री मकरंद आबा पाटील व अल्पसंख्यांक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांना ग्वाही
चिखली रमीज राजा :- नागपूर येथे पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्राचार्य डॉ, निलेश गावंडे यांनी ११ डिसेंबर २०२५ रोजी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद आबा पाटील तसेच क्रीडा युवक कल्याण व अल्पसंख्यांक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीप्रसंगी सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, शेखर बोंद्रे तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. योगेश काळे उपस्थित होते. या भेटीदरम्यान प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांनी चिखली शहरासमोरील महत्त्वाच्या नागरी समस्या आणि शहराच्या सर्वांगीण विकासाचे विषय मांडले. याबद्दल साधक बाधक चर्चा दोन्ही मंत्र्यांनी केली व शहराचा विकास तसेच अल्पसंख्यांक समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे ठोस आश्वासन दोन्ही मंत्र्यांनी डॉ. निलेश गावंडे यांना दिले.
प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून चिखली नगरपालिकेची निवडणूक लढवली. आपल्या प्रचारादरम्यान त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मतदारांसमोर प्रभावीपणे मांडला व जनतेने आपल्याला सेवेची संधी दिल्यास चिखली शहराचा कायापालट करू असे शब्द चिखलीकरांना दिले होते. याशिवाय अल्पसंख्यांक समाजाला देखील समानतेची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. आपल्या आश्वासनाचा पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने गावंडे यांनी नागपूर येथील अधिवेशनादरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील व राज्याचे क्रीडा – युवक कल्याण आणि अल्पसंख्यांक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करून शहरातील महत्त्वाचे प्रश्न दोन्ही मंत्र्यांसमोर मांडले. याशिवाय स्थानिक अल्पसंख्याक समाजाच्या विविध मुद्यांनाही हात घातला. या भेटी प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील व ना. माणिकराव कोकाटे यांनी चिखली शहराच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही तसेच शहरातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही प्राचार्य निलेश गावंडे यांना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील नेते आ. मनोज कायंदे आणि जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्या नेतृत्वाखाली चिखली नगर परिषद निवडणूक प्रक्रिया कशी नियोजनबद्ध, शांततेत व संघटनात्मक ताकदीच्या जोरावर पार पडली, याची सविस्तर माहिती सुद्धा प्राचार्य गावंडे यांनी नामदार पाटील व नामदार कोकाटे यांना दिली. प्रचार नियोजन, कार्यकर्त्यांचे समन्वय, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राबवण्यात आलेले उपक्रम तसेच निवडणूक काळातील अडचणी व त्यावर केलेले उपाय यांचाही आढावा यावेळी मांडण्यात आला. पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी सादर केलेल्या अहवालाची दखल घेत कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटन अधिक मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. या दरम्यान आमदार सना मलिक शेख तसेच युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांचीही भेट घेण्यात आली. या बैठकीत आगामी राजकीय घडामोडी, पक्षसंघटन बळकट करण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले आणि युवकांचा सहभाग वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती प्राचार्य डॉ निलेश गावंडे यांनी दिली आहे.



