ज्येष्ठ नागरिकाच्या समस्या ऐकून नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी दिले तातडीने कार्यवाहीचे आदेश

चिखली : सर्वसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या तत्परतेने सोडवणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळख असलेले चिखलीचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील व लोकाभिमुख कार्यपद्धतीचे दर्शन घडवले आहे. एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याच्या समस्या जाणून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.
जुनेगाव परिसरातील भीमज्योती नगरात वास्तव्यास असलेले ज्येष्ठ नागरिक भास्कर जाधव हे एकेकाळी सामाजिक चळवळीतील सक्रिय नेते राहिले असून, त्यांनी सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी बुलढाणा लोकसभा निवडणूकही लढवली होती. सध्या वाढत्या वयोमानानुसार त्यांना काही वैयक्तिक व स्थानिक नागरी समस्यांचा सामना करावा लागत होता. या अडचणींच्या निवारणासाठी त्यांनी थेट नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांची भेट घेतली.
नगराध्यक्षांनी अत्यंत आपुलकीने जाधव यांचे स्वागत करून त्यांच्या सर्व समस्या शांतपणे व सविस्तरपणे ऐकून घेतल्या. आपल्या व्यस्त कामकाजातून पुरेसा वेळ देत त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत या समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश दिले.
”नगर परिषदेचा प्रत्येक निर्णय आणि प्रशासकीय कार्य हे शहरातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे,” अशी ठाम भूमिका नगराध्यक्ष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. सत्तेचा बडेजाव न दाखवता एका ज्येष्ठ नागरिकाच्या प्रश्नावर त्यांनी दाखवलेली ही तत्परता आणि संवेदनशीलता शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे.



