पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांचे आवाहन

चिखली : तालुक्यात पावसाअभावी उद्भवलेली दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक नागरिकाने पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाणी हा जीवनाचा मूलाधार असल्याने त्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा, असे कळकळीचे आवाहन चिखलीचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी केले आहे.
नगराध्यक्ष देशमुख म्हणाले, “आज पाण्याचा प्रत्येक थेंब अत्यंत मौल्यवान आहे. आपण आज पाणी जपले तरच आपला उद्याचा दिवस सुरक्षित राहील. त्यामुळे शहरातील नागरिकांनी घरगुती तसेच सार्वजनिक पातळीवर पाण्याचा वापर संयमाने व काटकसरीने करणे ही काळाची खरी गरज आहे.”
शहरामध्ये अनेक ठिकाणी नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाणे, घरासमोरील अंगण वा रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा अवाजवी वापर करणे अशा प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते. अशा प्रकारांना नागरिकांनी तातडीने आळा घालावा, असे सांगत सार्वजनिक नळांवर पाणी भरल्यानंतर नळ उघडे न ठेवता नळाची तोटी व्यवस्थित बंद करावी, अशी विनंती त्यांनी केली.
केवळ नळधारकच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने स्वतःहून पुढे येऊन पिण्याच्या पाण्याचे रक्षण केले पाहिजे. संभाव्य तीव्र पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय पूर्णपणे टाळावा आणि जलसंधारणाच्या या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, अशी आग्रही साद नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी चिखलीकरांना घातली आहे.



