पाणी सोडा, अन्यथा थेट नदीपात्रात आमरण उपोषण!माजी आमदार संजय रायमुलकर यांचा इशारा
सत्तेत आपलाच गट, पण पाण्यासाठी आक्रमक पवित्रा

मेहकर (प्रतिनिधी ) पेनटाकळी प्रकल्पातून मेहकर नदीपात्रात तात्काळ पाणी सोडावे, अन्यथा थेट नदीपात्रात उतरून आमरण उपोषणाला बसणार, असा थेट इशारा मेहकर-लोणार विधानसभा क्षेत्राचे शिवसेना (शिंदे गट) माजी आमदार संजय रायमुलकर यांनी दिला आहे. राज्यात आणि मतदारसंघात आपल्याच गटाची सत्ता असतानाही लोकप्रतिनिधीला पाण्यासाठी उपोषणाचा इशारा द्यावा लागल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शासनाच्या अधिकृत निकषांनुसार आणि उपलब्ध पाण्याच्या नियोजनानुसार नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी रायमुलकर यांनी केली आहे. “शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आमचा निर्धार अढळ आहे. शेतकऱ्यांचे पीक सुकत असताना आणि पिण्याच्या पाण्याची गरज असताना जलसंपदा विभाग अथवा प्रशासन दिरंगाई करत असेल, तर गप्प बसणार नाही,” असा रोखठोक इशारा त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिला.
शेतकरी व नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर
पेनटाकळी प्रकल्पात पुरेसा जलसाठा उपलब्ध असतानाही योग्य वेळी पाणी न सोडल्यामुळे मेहकर परिसर आणि नदीकाठच्या गावांमधील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी हे पाणी सोडणे अत्यंत आवश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार रायमुलकर यांनी प्रशासनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
सत्ताधारी पक्षातीलच ज्येष्ठ नेत्याने आणि माजी आमदाराने थेट उपोषणाचा इशारा दिल्याने महसूल व जलसंपदा विभाग बॅकफूटवर आला आहे. आता रायमुलकर यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन तातडीने पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेणार, की माजी आमदारांना खरोखरच नदीपात्रात आमरण उपोषणाला बसावे लागणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि विशेषतः शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.


