फुस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा लावला सहामहिन्यानंतर छडा
दुय्यम ठाणेदारांच्या दिरंगाईमुळे युवतीच्या पोटात चार महिण्याचा गर्भ

साखरखेर्डा : (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या शेंदुर्जन येथील वसंतराव नाईक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यानीला सहा महिण्यापूर्वी फूस लावून पळवून नेल्यानंतर सदर युवतीला शोधून काढण्यास साखरखेर्डा पोलीसांना यश आले आहे.
प्राप्त माहितीनुसार असे समजते की, शेंदूर्जन येथील १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीस गावातीलच गणेश विठ्ठल वडूळे याने लग्नाचे आमिष दाखवून दि. २३ जून २०२५ रोजी घरी कुणी नसल्याचे पाहून सदर युवतीस पळवून नेले होते. मुलीच्या वडिलांनी याबाबत साखरखेर्डा पोलीसात दि. २५ जून रोजी तक्रार दिल्यानंतर या घटनेचा तपास दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप यांचेकडे देण्यात आला होता. काही दिवसानंतर मुलीच्या शेतमजूर वडिलांनी पोलिसांकडे मुलीचा शोध घेण्यासाठी वारंवार विनवणी केली मात्र पोलिसांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप याप्रकरणी काहीच तपास करीत नसल्याचे पाहून ठाणेदार गजानन करेवाड यांनी संलग्न पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांच्याकडे हा तपास सुपूर्द केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे, पोलीस हेकॉ रामदास वैराळ असे पथक दि. १२ डिसेंबर रोजी पुणे येथील रांजणगाव येथे रवाना झाले. तेथे दिवसभर शोध घेतला असता मध्यरात्री रांजणगाव करडे रोडलगत एका वस्तीत ह्या जोडप्याला सीनेस्टाईल ताब्यात घेण्यात आले.
गत सहा महिण्यापासून बेपत्ता अल्पवयीन मुलीचा एकाच दिवसात छडा लावल्याबद्दल ठाणेदार करेवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांचे कौतुक होत आहे. दरम्यान पिडीत युवतीला पोलीसांनी आई-वडिलांच्या ताब्यात दिले असून आरोपीस गजाआड केले आहे.दुय्यम ठाणेदारांच्या दिरंगाईमुळे मुलगी गरोदर : वडिलांचा आरोप तपास अधिकारी असलेले दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप यांना माझ्या मुलीस शोधण्यासाठी वारंवार विनवणी केली मात्र त्यांनी हलगर्जीपणा केला. माझी मुलगी नेमकी कोठे आहे याची माहितीसुद्धा दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप यांना मी दिली होती मात्र त्यांनी दिरंगाई केल्याचा आरोप पीडीत मुलीच्या वडिलांनी केला आहे. सानप यांच्या दिरंगाईमुळेच माझ्या मुलीच्या पोटात चार महिण्याचा गर्भधारणा झाली असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी पिडित मुलीच्या पित्याने केली आहे.



