मुख्य सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

साखरखेर्डा : (प्रतिनिधी) बुलढाणा जिल्हा काष्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करीत मुख्य सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करुन आरोपीला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली .
दि.१५ ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्हा काष्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस सुभाष डोंगरदिवे , कास्ट्राईब शिक्षक संघटना राज्य उपाध्यक्ष दिलीप खंडारे , जिल्हाध्यक्ष शेषराव वाकोडे , जिल्हा सरचिटणीस प्रदीप इंगळे , तालुकाध्यक्ष राजू जाधव , प्रदीप बावस्कर , सुयोग चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले . त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की , महामहीम सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर राकेश किशोर या वकीलाने कामकाज सुरू असताना पायातील बूट काढून तो सरन्यायाधीश यांच्या दिशेने भिरकावला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा तसेच भारतीय लोकशाही, संविधानाचा अवमान केला आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषी वकीलावर कठोर कारवाई करुन अशा प्रकारच्या घटनांवर भविष्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली आहे .


