विशेष लेख

सोशल मिडिया, अल्गोरिदम आणि आजची पिढी

आजचा काळ माहितीचा महासागर आहे. या महासागरात सोशल मिडिया हे सर्वात आकर्षक, वेगवान आणि प्रभावी माध्यम बनले आहे. पण या आकर्षणाच्या आड एक शांत, अदृश्य शक्ती काम करते — ती म्हणजे अल्गोरिदम. हा शब्द जरी तांत्रिक वाटत असला तरी त्याचा परिणाम आपल्या जीवनशैली, विचारप्रक्रिया आणि सामाजिक संबंधांवर खोलवर होत आहे.

अल्गोरिदम म्हणजे काही नियम आणि गणिती प्रक्रियांवर आधारित संगणकसूत्र, जे ठरवतात की कोणत्या व्यक्तीला कोणती माहिती दिसावी. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स जसे की इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, आणि एक्स (ट्विटर) हे प्रत्येक वापरकर्त्याचे वर्तन म्हणजे तो काय पाहतो, कुठे थांबतो, काय लाईक करतो, कोणत्या विषयावर प्रतिक्रिया देतो याचे विश्लेषण करतात. त्यावरून ते आपल्याला “आपल्याला आवडेल” असेच पोस्ट, व्हिडिओ किंवा बातम्या दाखवतात.

यातून दिसणारा जगाचा आरसा वास्तवापेक्षा वेगळा असतो. आपण जणू एका डिजिटल भुलभुलैयामध्ये अडकतो, जिथे आपले विचार, मतं, आवडी ह्यांचाच प्रतिध्वनी ऐकू येतो.

आजच्या पिढीने अल्गोरिदमचा शिकार होण्याऐवजी चालक व्हावं आजच्या तरुण पिढीचा मोठा भाग दिवसाचे अनेक तास सोशल मिडियावर घालवतो. मनोरंजन, शिक्षण, मैत्री, व्यवसाय सगळं तिथेच! पण हळूहळू ही सवय अवलंबित्वात रूपांतरित होते.

“लाईक” आणि “फॉलोअर्स” यांची संख्या ही आत्ममूल्य ठरवू लागते. लोकांचे खोटे परिपूर्ण जीवन पाहून स्वतःबद्दल कमीपणा वाटतो. नैराश्य, ताण, आणि मानसिक थकवा या समस्या वाढताना दिसतात. अनेक संशोधनांनी दाखवले आहे की सततचा डिजिटल स्पर्धेचा ताण युवकांच्या आत्मविश्वासावर परिणाम करतो.

याहून गंभीर बाब म्हणजे, अल्गोरिदम आपल्याला जे आवडते तेच दाखवतो, त्यामुळे विरोधी मतं ऐकण्याची संस्कृती कमी होत चालली आहे. समाज “इको चेंबर” मध्ये अडकतो जिथे प्रत्येकाला आपलेच विचार योग्य वाटतात. परिणामतः मतभेद असहिष्णुतेत रूपांतरित होतात.

अल्गोरिदमचा आपण सकारात्मक उपयोग करू शकतो
अर्थातच, सोशल मिडिया ही फक्त नकारात्मक गोष्ट नाही. योग्य वापर केला तर ती सामाजिक बदलाचे शक्तिशाली साधन बनू शकते. अल्गोरिदम समजून घेतल्यास आपण त्याचा उपयोग आपली वैचारिक वाढ, सामाजिक जागरूकता, उद्योजकता आणि शिक्षणासाठी करू शकतो.

पर्यावरण, स्त्रीसक्षमीकरण, शेतकरी आंदोलन, आरोग्य, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत सोशल मिडियाने परिवर्तन घडवले आहे.छोट्या गावातील उद्योजकांना, कलाकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आपला आवाज जागतिक स्तरावर पोहोचवता आला आहे.डिजिटल साक्षरता वाढवून तरुणांनी अल्गोरिदम आपल्यासाठी काम करायला लावला, तर तो एक प्रभावी मित्र बनू शकतो.

आपल्याला स्वतःचं डिजिटल शिस्तपालन करावं लागेल.
सोशल मिडियावर घालवलेला वेळ नियंत्रित ठेवणे
माहिती तपासून वाचणे
भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक संवाद साधणे
विविध स्रोतांमधून मतं जाणून घेणे ही पावलं लहान वाटली तरी ती समाजातील वैचारिक संतुलन राखण्यासाठी आवश्यक आहेत.

सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनीही जबाबदारी घ्यावी. अल्गोरिदम पारदर्शक करणे, चुकीची माहिती आणि द्वेषपूर्ण सामग्री रोखणे, आणि युवकांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणारी धोरणं राबवणे ही काळाची गरज आहे.

सोशल मिडिया ही तलवार आहे तिचा वापर कसा करायचा, हे ठरवणं आपल्या हातात आहे.
आजच्या पिढीने या डिजिटल जगात हरवायचं नाही, तर त्यातून विचार, जागरूकता आणि परिवर्तनाचं बीज पेरायचं आहे.
अल्गोरिदम आपल्याला चालवणार नाही, आपणच अल्गोरिदम चालवू हीच खरी डिजिटल क्रांती ठरेल.

 

संतोष हरीभाऊ दुर्गे
९६०७७८९१३६
sdurge271@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!