वानखेडात भोजने परिवाराने समाजा समोर आदर्श रूढी परंपरेला फाटा देत, तीन मुलींनी दिला जन्मदात्या आईच्या पार्थिवाला खांदा आणि अग्नी


संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील वानखेड येथे एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि हृदयस्पर्शी घटनेने समाजातील जुन्या रूढी परंपरांना मुठ माती देत सुंदरबाई उत्तमराव भोजने(वय ७७) यांच्या निधनानंतर, त्यांच्या तिन्ही मुलींनी केवळ त्यांच्या पार्थिवाला खांदा मुख अग्नी देऊन सर्व अंत्यसंस्कार विधी पार पाडल्याने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला.
वानखेड येथील सुंदरबाई उत्तमराव भोजने यांचे शनिवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान निधन झाले. त्या प्राध्यापक आनंद उत्तम भोजने यांच्या मातोश्री होत्या.मुलींनी पूर्ण केली इच्छा ! परंपरागत विचारांना फाटा देत प्रा. आनंद भोजने यांनी आपल्या मातोश्रीच्या पार्थिवाला मुलींनीच खांदा द्यावा आणि अग्नी द्यावा अशी क्रांतिकारी इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या पुरोगामी विचारांना प्रतिसाद देत सुंदरबाई यांच्या तिन्ही मुली – शोभाबाई वानखडे, बालुबाई गवई, आणि पद्माबाई धांडे – यांनी पुढाकार घेतला. रूढी-परंपरांना मूठमाती देत या तिन्ही बहिणींनी आपल्या जन्मदात्या आईच्या पार्थिवाला खांदा दिला आणि स्वतः मुख अग्नी देऊन अंतिम संस्काराचे सर्व विधी पूर्ण केले.
महिलांचा ऐतिहासिक सहभाग
या अंत्ययात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रा. आनंद भोजने यांच्या विनंतीनुसार, पुरुषांच्या बरोबरीने गावातील महिलांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला. वानखेड येथील हजारो वर्षांची ‘स्मशानभूमीत फक्त पुरुषांनीच जावे’ ही परंपरा मोडीत काढून, महिला स्मशानभूमीपर्यंत उपस्थित राहिल्या आणि त्यांनी संपूर्ण विधी आपल्या समक्ष पाहिला.
ग्रामीण भागात आजही ‘मुलगा नसेल तर मोक्ष प्राप्त होत नाही,’ ‘मुलाने मुख अग्नी दिला तरच उद्धार होतो,’ असे अनेक गैरसमज प्रचलित आहेत. बुद्ध,फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असलेल्या भोजने परिवाराने या सर्व गैरसमजूतींना आपल्या कृतीतून अंधश्रध्देला छेद दिला आहे.
पैसा, संपत्ती, घर किंवा शेती याचा वारसा हक्काबाबत पुरुष असावा या विचारालाही या तीन धाडसी बहिणींनी आपल्या कृतीतून मोडीत काढले आहे. त्यांच्या या कार्यामुळे . “हीच माझ्या आईची खरी कमाई,” असे उद्गार प्रा. आनंद भोजने यांनी काढले. “आज माझ्या आईच्या अंत्ययात्रेत गावातील महिलांनी स्मशानभूमीपर्यंत येऊन सहभागी होणे आणि अंत्यविधी पाहणे, हीच खऱ्या अर्थाने माझ्या आईला श्रद्धांजली आहे,” असे ते म्हणाले. परंपरेची बंधने झुगारून धाडस दाखवणाऱ्या या बहिणींच्या कार्यामुळे वानखेड गावाने आज पुरोगामी विचारांचा एक नवा अध्याय लिहिला आहे. त्यामुळे भोजने परिवाराच्या परीवर्तनवादी कृती प्रत्येक गावाने केली पाहिजे अंधश्रद्धेला छेद देत जुन्या रूढी परंपरांना मुठ माती देत समाजा पुढे नविन आदर्श निर्माण केल्या बद्दल भोजने परिवारातील धाडसी मुली सह या कार्याला प्रोत्साहन देणारे शाहू फुले आंबेडकर विचार सरणीचे खरे पाईक प्रा आनंद भोजने व परिवाराचे कौतुक होत आहे



