रांगोळीतून साकारला महादेव; पारधमध्ये धनंजय देशमुख यांच्या कलेला ग्रामस्थांची दाद…

भोकरदन तालुक्यातील भोकरदन येथील पारध गावात महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त रांगोळी कलाकार धनंजय देशमुख यांनी साकारलेली भगवान शंकराची भव्य रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने गावातील मंदिर परिसरात देशमुख यांनी आकर्षक रंगसंगती, बारकावे आणि कलात्मक रचना यांचा सुंदर संगम साधत भगवान शंकर महादेवांची प्रतिमा रांगोळीतून साकारली. या रांगोळीमध्ये शिवरायांचा त्रिशूल, डमरू, जटाधारी रूप आणि गंगामाता यांचे देखणे चित्रण करण्यात आले होते. रांगोळी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
या अनोख्या कलाकृतीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांकडून कलाकाराचे कौतुक होत आहे. “कलेच्या माध्यमातून भक्ती व्यक्त करण्याचा हा एक सुंदर प्रयत्न आहे,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
धनंजय देशमुख हे नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांत आपल्या रांगोळी कलेतून वेगळी छाप पाडत असून, त्यांच्या या उपक्रमामुळे पारध गावाच्या सांस्कृतिक परंपरेत भर पडली आहे.
रवींद्र लोखंडे (मा. शिक्षक)
धनंजय देशमुख हा लहानपणापासूनच चित्रकलेची आवड जोपासणारा विद्यार्थी होता. शालेय जीवनातही तो नेहमी चित्रकला, रांगोळी व विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घ्यायचा. सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि कलेप्रती असलेली निष्ठा यामुळे आज तो अतिशय सुंदर व आकर्षक चित्रे तसेच रांगोळ्या साकारत आहे. त्याची ही कला इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून शिक्षणासोबत कला जोपासल्यास मोठे यश मिळू शकते, याचे तो उत्तम उदाहरण आहे.



