जिल्हा वार्ता

निर्भीड लेखणीचा बुलंद आवाज पत्रकार डॉ. गुलाबराव इंगळे यांचे दुःखद निधन

 

बुलडाणा [प्रतिनिधी ] पत्रकारिता क्षेत्रातील धाडसी, निर्भीड, स्पष्टवक्ते आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार तथा ‘सकाळ’चे तालुका प्रतिनिधी डॉ. गुलाबराव नामदेव इंगळे यांचे रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या त्यांच्या असंख्य चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.डॉ. गुलाबराव इंगळे हे सन १९९२ पासून पत्रकारिता क्षेत्रात अग्रस्थानी राहिले. त्यांनी दैनिक महासागर मधून पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच सत्य परिस्थिती निर्भीडपणे मांडण्याची, जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची त्यांची भूमिका राहिली.
तब्बल तीन दशकांहून अधिक काळाच्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण लेखणीच्या बळावर पत्रकारिता क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविला
दबावापुढे न झुकणारी निर्भीड लेखणी
सामान्य माणसाच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे आणि वस्तुस्थिती कोणत्याही दबावाविना मांडणे, ही त्यांच्या पत्रकारितेची खास ओळख होती.कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्याच्या बाजूने उभे राहण्याची त्यांची भूमिका कायम राहिली. त्यांच्या लेखणीतून अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या प्रश्नांना वाचा मिळाली. प्रशासनाचे लक्ष जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे वेधून त्यावर सकारात्मक कार्यवाही व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.पत्रकारांच्या हक्कांसाठी डॉ. इंगळे यांनी सातत्याने कार्य केले. ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या जागतिक पत्रकारिता संघटनेचे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी सक्रिय भूमिका बजावली.पत्रकारिता समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे, या भावनेतून त्यांनी आपले संपूर्ण पत्रकारितेचे आयुष्य जगले
डॉ. गुलाबराव इंगळे यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. प्रा. कल्पना इंगळे, मुलगा निशांत इंगळे — इंजिनिअर (एम.एस., जर्मनी) आणि मुलगी डॉ. कल्याणी इंगळे एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळा बाजार, असा परिवार आहे. सत्याच्या बाजूने निर्भीडपणे उभा राहणारा, सामान्यांच्या व्यथा मांडणारा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारा एक बुलंद आवाज कायमचा शांत झाला डॉ. गुलाबराव इंगळे यांची निर्भीड लेखणी, स्पष्टवक्तेपणा, अभ्यासू पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी सदैव स्मरणात राहील दैनिक विदर्भ दस्तक परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!